मत्स्यशेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा
लाभ घेऊन संस्था बळकटीकरण करावे
- प्रादेशिक उपायुक्त, मत्स्यव्यवसाय विजय शिखरे
मच्छिमारांसाठीची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
सांगली, : मत्स्यशेतकऱ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपल्या संस्थेचे बळकटीकरण व विस्तार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाचे पुणे विभागीय प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे यांनी आज येथे केले.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव टी. वाघ होते. लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अॅकॅडमी फॉर को ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र (एन. सी. डी. सी). पुणे., सहकार मंत्रालय, भारत सरकार आणि मत्स्यव्यवसाय विभाग भारत सरकार व महाराष्ट्र राज्य तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या या कार्यशाळेस सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अमर पाटील, सहकार अधिकारी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध)सांगली-मिरज सुरेश पाटील तसेच जिल्ह्यातील मत्स्यशेतकरी उत्पादक संस्थांचे मच्छिमार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकारांतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून नीलक्रांती अधिक प्रभावशाली करता येईल, अशी भावना व्यक्त करून अध्यक्षीय भाषणामध्ये शिवाजीराव वाघ म्हणाले, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ, मत्स्यव्यवसाय कार्यालय सांगली जिल्हा व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगली यांच्या संयुक्त प्रयत्नांतून जिल्ह्यातील मत्स्य शेतकऱ्यांना सक्ष्ा्म करण्याचा प्रयत्न करु. मत्स्यव्यवसायात महिलांचे प्रमाण अत्यल्प असून, महिलांनी एकत्र येऊन मत्स्यसंस्था स्थापन करायला हव्यात. केंद्र व राज्य शासनाने सदर व्यावसायिकांना क्रेडिट गँरटीसारख्या सुविधा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अमर पाटील यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणींसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सांगली कार्यालयाचे सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांसाठी असलेल्या विविध योजनांसाठी प्रस्ताव कसे तयार करावयाचे, यासंदर्भात रायगड जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती सहकारी संघाचे अमोद साळगावकर यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान मच्छिमार बांधवांसाठी झालेल्या सादरीकरणामध्ये राष्ट्रीय सहकारी विकास निगम, पुणेचे उपसंचालक गणेश गायकवाड यांनी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली.
सूत्रसंचालन अंकुर यादव यांनी केले. पारुल सिंग, एन. सी. डी. सी. यांनी आभार मानले. या एक दिवसीय कार्यशाळेस विविध मच्छिमार संस्थेच्या मच्छीमाराचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
00000
Post a Comment
0Comments