मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये
यासाठी सर्वांनी जागरूक राहावे
- अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख
जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी हक्क दिन साजरा
सांगली,: समाजातील तळागाळातील जनतेला मानवी हक्काचे ज्ञान माहीत होण्याच्या दृष्टीने मानवी हक्क दिन साजरा केला जातो. आपल्या दैनंदिन जीवनात कळत नकळत आपल्याकडून मानवी हक्कांचे उल्लंघन होत असते. मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वांनी जागरूक असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी केले.
मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी वसुंधरा बारवे आणि सविता लष्करे, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, दादासाहेब कांबळे, रघुनाथ पोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख म्हणाल्या, आपल्या कुटूंबातही आपले मत इतरांच्यावर लादण्याअगोदर कुटूंबातील इतरांचे मत जाणून घेणे आवश्यक आहे. स्त्री, पुरूष भेदभाव करू नये. आपले दैनंदिन जीवन चांगले कसे बनवू, आपण सदृढ व चांगल्या विचाराने जगणे हा या मागचा हेतू आहे. यासाठी मानवी हक्क दिनाचे मोठे महत्व आहे. चांगले जीवन व्यतीत होण्यासाठी मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे सांगून त्यांनी मानवी हक्क दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी मानवी हक्क दिन साजरा करण्यामागचा हेतू व महत्व विशद करून मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर समाजातील तळागाळापर्यंत जनतेला मानवी हक्कांचे ज्ञान माहीत होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्या म्हणाल्या.
00000
Post a Comment
0Comments