फिश मार्केटमध्ये अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

Admin
By -
0


 फिश मार्केटमध्ये अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

फिश मार्केटच्या वास्तूचे भूमिपूजन संपन्न.                               सांगली, दि. 10  महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या फिश मार्केटच्या वास्तूचे काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे. हे फिश मार्केट सर्व सोयीसुविधांनीयुक्त होण्यावर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी भर द्यावा, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले.

सांगली येथील खणभाग येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत फिश मार्केटच्या भूमिपूजनांतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, पुणे विभाग मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे, महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ, महानगरपालिका शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, सम्राट महाडिक, स्वाती शिंदे, सुनंदा राऊत यांच्यासह महानगरपालिकचे आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले, हा अतिशय चांगला प्रकल्प आहे. विकासाची प्रक्रिया अशीच चालू ठेवावी. अधिकच्या चांगल्या सोयीसाठी या वास्तूमध्ये आणखी एक मजला वाढविण्यासाठी व कोल्ड स्टोरेजबाबत मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा. लवकरात लवकर तो मंजूर करू. शासन म्हणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सदैव कटिबध्द आहे. फिश मार्केट तयार झाल्यानंतर मत्स्य व्यावसायिकांनी रस्त्यावर  विक्री न करता फिश मार्केटमध्येच करावी, असे ते म्हणाले. 

यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगली शहरात एक चांगली वास्तू उभारत आहे. यासाठी आवश्यकता भासल्यास खासदार फंडातूनही मदत करू.  हा चांगला प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.

महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, फिश मार्केट पूर्ण होईपर्यत येथील व्यावसायिकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरात लवकर ही वास्तू उभारण्यासाठी प्रयत्न करू. या वास्तूमध्ये आणखी एक मजला व कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करू. या माध्यमातून मत्स्य व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची चांगली संधी उपलब्ध होईल असे ते म्हणाले.

स्वाती शिंदे यांनी ही वास्तू उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर सांगली शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न करू असे त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या फिश मार्केटच्या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम 8 कोटी 7 लाख 53 हजार इतकी आहे. कामाचे क्षेत्रफळ 1520 चौरस मीटर असून यामध्ये 3 x 3 मीटरचे 81 दुकान गाळे, मासळी बाजारमध्ये वेस्ट डिस्पोजल युनिट, 14.73 मीटर x 3 मीटरची स्टोअर रूम, पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, ग्रॅनाईट फ्लोरिंग, प्रत्येक दुकानासाठी मासे स्वच्छतेसाठी स्वतंत्र नळ कनेक्शन व प्लॅटफॉर्म, ड्रेनज व्यवस्था, 3 मीटर रूंदीचे अंतर्गत पॅसेज, 100 दुचाकी व 30 चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था अशा सोयी सुविधा असणार आहेत, असे सांगितले.

या कार्यक्रमास नागरिक, व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)