खरसुंडीच्या जनावरच्या यात्रेत दोन कोटीची उलाढाल

Admin
By -
0


 खरसुंडी येथे गुरुवारी 16 जानेवारी जनावराचे प्रदर्शन              खरसुंडी ता आटपाडी येथील खिलार जनावरांच्या यात्रेत सुमारे वीस हजाराहून अधिक जनावरांचीआवक  झाली असून चार दिवस चाललेल्या  बाजारात दोन कोटी पेक्षा अधिक उलाढाल झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेने बाजारात कमी उलाढालआहे 

महाराष्ट्र, कर्नाटक ,आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यात जातिवंत खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या यात्रेस पौष पौर्णिमेपासून सुरुवात झाली. यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती, मात्र या काळात सुरू असणाऱ्या औंध, विजापूर व सोलापूर या यात्रामुळे काही प्रमाणात उलाढाल घटल्याचे यात्रेमध्ये दिसून आले. प्रामुख्याने एक वर्षाच्या आतील खोंडांना मागणी असणारे कर्नाटकातील व्यापारी कमी प्रमाणात आले होते. मात्र कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे ,मुंबई व कोकण या भागातून शर्यती साठीच्या खोंडांसाठी हौशी शेतकरी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. बाजारात एक वर्षाच्या आतील खोंडांना तीस हजारांपासून दोन लाखापर्यंत मागणी झाली. आगामी चिंचणी यात्रेसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बैलांची खरेदी केली. 
जातिवंत खिलार जनावरांसाठी खरसुंडी येथील बाजार प्रसिद्ध आहे. वर्षातून दोन वेळा यात्रा भरणारे हे एकमेव ठिकाण आहे. सुमारे दोन शतकांहून अधिक काळाची परंपरा असणाऱ्या यात्रेला बाजार तळाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. वेळोवेळी बदलणाऱ्या बाजार तळामुळे शेतकरी, व्यापारी, बाजार समिती ,ग्रामपंचायत यांना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यासाठी नवीन यात्रातळ कायमस्वरूपी अधिग्रहण करणे आवश्यक आहे. 
बाजारात शेती उपयोगी हत्यारे व  अवजारे, जनावरांच्या साहित्याची व्यापारी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले होते. यात्रेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी व ग्रामपंचायत खरसुंडी यांच्या वतीने आरोग्य ,वीज, पाणी व अन्य सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. उद्या ता. १६ गुरुवार रोजी पशु प्रदर्शनाने यात्रेची सांगता होणार आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)