सांगली ग्रंथोत्सव 2024 च्या पहिल्या दिवशी वाचनप्रेमींना साहित्यिक मेजवानी मिळाली. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सांगली ग्रंथोत्सव 2024 चे उद्घाटन झाले.
पहिल्या सत्रात आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने… या विषयावर दिलखुलास गप्पा हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये लेखक अरूण नाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधला. संवादक विठ्ठल मोहिते होते. दुसऱ्या सत्रात साहित्य, सोशल मीडिया आणि मुले या विषयावर डॉ. अनिल मडके यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. साहित्यिक रघुराज मेटकरी, डॉ. दिलीप शिंदे व मानसतज्ज्ञ डॉ. कालिदास पाटील परिसंवादातील सहभागी वक्ते होते. तिसऱ्या सत्रात माय मराठी अभिवाचन स्पर्धा घेण्यात आली. यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालय, शांतिनिकेतन यांच्यातर्फे हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. संवादक म्हणून शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी हर्षा बागल होत्या.
सकाळी पद्मभूषण वसंतदादा पाटील पुतळा, जुने स्टेशन चौक, काँग्रेस भवन, राम मंदिर चौक मार्गे कच्छी भवन पर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा कोषागार अधिकारी सुरेखा जाधव (दौंड), जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे आदि उपस्थित होते.
सांगली ग्रंथोत्सव 2024 मध्ये लावण्यात आलेल्या पुस्तकांच्या स्टॉलना वाचनप्रेमींचा प्रतिसाद लाभत आहे. पुस्तकविक्री वाढावी, यासाठी प्रकाशक व पुस्तकविक्री संस्थांच्या सवलतीत भर म्हणून पालकमंत्री यांनी स्वतः 10 टक्के सवलत जाहीर केली. ग्रंथोत्सव 2024 मध्ये विक्रीच्या पावत्या ग्रंथालय अधिकाऱ्यांकडे सादर केल्यास, सवलतीची 10 टक्के रक्कम आपण वैयक्तिकरीत्या देऊ, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. त्याचाही पुस्तकप्रेमींचा फायदा होणार आहे
Post a Comment
0Comments