दोन दिवसीय सांगली ग्रंथोत्सव 2024 ची सांगता
सांगली ग्रंथोत्सव 2024 च्या दुसऱ्या व अंतिम दिवशी वाचन, विज्ञान व संविधानाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांनी रंगत आणली.
पहिल्या सत्रात चला संकल्प करूया वाचनाचा या विषयावर ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली महाचर्चा घेण्यात आली. यामध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, निवृत्त ग्रंथपाल आप्पासाहेब मासुले, श्रीमती पुतळाबेन शहा कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या ग्रंथपाल संध्या यादव आणि सर्वोदय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जीवन सर्वोदय हे वक्ते महाचर्चेत सहभागी झाले होते.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात हसत खेळत विज्ञान या विषयावर विज्ञान लेखक व प्रसारक जगदीश काबरे यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात बदलती जीवनशैली टिपणाऱ्या कवितांची मैफल प्रसिद्ध कवी सुभाष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली रंगली. यामध्ये सादर करण्यात आलेल्या कवितांना उपस्थितांनी दाद दिली.
चौथ्या सत्रात भारतीय संविधान आपले भविष्य या विषयावर प्रा. निरंजन व्याख्याते यांचे व्याख्यान झाले. समारोप सत्रात वाचक व विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. गौतमीपुत्र कांबळे प्रमुख अतिथी होते. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. संवादक म्हणून विठ्ठल मोहिते यांनी भूमिका पार पाडली.
यावेळी ग्रंथालय कार्यालयाचे अधिकारी, जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, ग्रंथप्रेमी, साहित्यरसिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कच्छी जैन भवन येथे आयोजित या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या यशस्वी संयोजनासाठी प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी मार्गदर्शन केले. सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांच्यासह ग्रंथालय कार्यालयातील कर्मचारी, जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांनी मेहनत घेतली.
सांगली ग्रंथोत्सव 2024 निमित्त पुस्तक प्रदर्शनास वाचकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला.
Post a Comment
0Comments