प्रभूचा जाण्याचा प्रसंग काळजाला भिडणारा, माणसांनी आपल्या पायरीन रहावं ही शिकवण देऊन जाणारा ,सुखा समाधानाची व्याख्या सुशिक्षित असूनही बऱ्याच जणांना आयुष्य संपत आले तरी कळत नाही पण सुखाची ,समाधानाची व्याख्या समजलेला, आयुष्याचं गमक कळालेला प्रभू तसा सुसंस्कारित होता! थोरामोठ्याशी, लहानांशी आदबिनं राहायचा! नीती तत्व पाळणारा व्रतस्थ, सेवाधर्म पाळलेला एक कर्मयोगी! आयुष्य संपूर्ण उन्हात! संसाराचा एक एक गुंता सोडविण्यात संपूर्ण आयुष्य खर्ची पडलेला! मुलगा साहेब होण्याची स्वप्न पाहणारा हा मायाळू बाप होता. पोटाचा खळगा रिकामा तो रिकामाच! आता कुठे प्रभुचे खायचे दिवस आले होते, चालणं एवढेच माहीत! प्रभूचं नाक आणि कपाळ जमिनीवर टेकलेले असायचं, घासलेलं असायचं! जणू जमिनीला सांगत होता 'तुझं आणि माझं नातं वेगळंच आहे! माती आणि चिखल अंगाला, कपाळाला लावणारा परभू मातीशी इमान राखणारा होता !जणू सांगत होता मला तुझ्याच कुशीत यायचं आहे! जग चाललयं, धावतयं! माणसं विसरतील प्रभूला पण प्रभूने जोडलेल्या जीवनदायीनी माणसांच्या तृष्णा भागवत राहतील! त्या माध्यमातून प्रभू आपल्यात असेल! लेकरांच्या माता लेकरांची घाण काढतात पण प्रभूने साऱ्या समाजाची घाण काढली! कधी किळस केली नाही! प्रभू समाजाची आई होऊन गेला !ओढ्याच्या काठी प्रभूचा जन्माचा पाळणा! प्रभूचे बालपण ओढ्याने पाहिलं ! ओढ्याच्या निवळसंग पाण्याची निर्मळता त्याच्या मनात उतरली होती! म्हणून तो मनानं आयुष्यभर स्वच्छ राहिला !करंजाच्या पिंपळाच्या सावलीत प्रभू वाढलेला पण कामाच्या माध्यमातून जीवनाची उंची वाढवून गेला! तोलता न येणारी माया ,काळजात कैवार असणारा प्रभू ज्यांना समजला तो त्यांचाच होऊन गेला! माणसांच्या गर्दीत प्रभूने आदराने मारलेली हाक अजूनही कानात घुमते! अनेक स्थित्यंतर प्रभूने पाहिली ,पण ज्याचा त्याचा मान राखून प्रभू हृदयात घर करून गेला !एका भल्या कर्मी माणसाच नियतीने मातेरं करून टाकलं !नशिबी कायमच दुर्दैव बांधलेले! तसं प्रभूचं सारच खानदान, नातलग नम्र सेवा व्रत स्वीकारलेली ,!विस्कटलेल्या केसात चिखलाने माखलेल्या कपड्यात प्रभूचं मनमुराद हसणं आणि त्याचा प्रेमळ चेहरा कमळासारखा दिसायचा !दुसऱ्यासाठी रणरणत्या उन्हात खपणारा प्रभू हा खरच प्रभू होता ! प्रभू गेला!धावणारे जग थोड्या काळासाठी थांबलं! कारण प्रभू होताच तसा ,आपल्या सेवा धर्मात सुद्धा माणसं उच्च पदाला पोहोचतात त्याचे उत्तम उदाहरण, प्रतीक म्हणजे प्रभू! मुलाच्या नोकरीसाठी पै पै जोडणारा प्रभू प्रेमळ बाप होता! दुसऱ्याचे आयुष्य सुखी व्हाव म्हणून राबणारा प्रभू होता ! इतरांचं जीवन सुसह्य करणं हेच त्याच्या जीवनाचं मूलतत्त्व होतं! जातीपातीच्या कुंपणात राहून अथांगात गुमान विरून जाणं प्रभूने खरच साध्य केलं !माळा- माळावर फिरणं ,दिला शब्द पाळणं !नकार कधी रक्तात नाही ,जगण्यातली,मनातली श्रीमंती प्रभू तुझ्याकडून अनुभवली! व्रतस्थ ,इमानी राहणं, कर्मातला आनंद शोधणं! कशाला उद्याची बात म्हणून आजचं काम आजच फतेह करणे, हे प्रभूचं धोरण आत्मसात करण्यासारखं !एखाद्याला हृदयापासून नमस्कार करायलासुद्धा मनाचा खूप मोठेपणा लागतो !तो प्रभूच्यात ठासून भरलेला! "विसावा" शब्द मात्र प्रभूच्या जीवनातून कुणीतरी ओरबडून नेलेला !मात्र जगाची कोडी प्रभू उलगडत राहिला! प्रभूच्या मूकपणाने सुद्धा खूप काही शिकवलं ! प्रभू च्या अपघातावेळी त्याने जोडलेल्या माणसांवरून त्याची श्रीमंती दिसून आली ! प्रभू जणू म्हणत होता,
"सगळ्यासाठी राब राबलो कशात माझं चुकलं रं !
खोटं बोलूनी पोट भरतया म्हणून का रं जगायचं ?
खरं बोलणं ,भोळ वागणं नाही कुणाला माझ्या सारखं जमलंरं!
"एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात ,शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात "
"कधी उन्हामध्ये न्हालो ,कधी चांदण्यात!
मुका बावळा मी भोळा,पडेन का तुझीया डोळा!
मलिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात, तुझ्या मंदिरात!!!
प्रभू तुला भावपूर्ण श्रध्दांजली🌹🌹🙏
जयसिंग आबासाहेब देशमुख
दिघंची गर्ल्स हायस्कूल दिघंची
दि आटपाडी एज्युकेशन सोसायटी आटपाडी
Post a Comment
0Comments