- जिल्हाधिकारी अशोक काकडे
नागठाणेच्या बालगंधर्व स्मारक कामाची केली पाहणी
सांगली, नागठाणे या नटसम्राट बालगंधर्व यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाच्या रूपातून एक चांगली वास्तु उभारली जात असून, या माध्यमातून बालगंधर्वांच्या सांस्कृतिक ठशाचे व त्यांच्या स्मृतींचे जतन होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज केले.
मौजे नागठाणे येथील नटसम्राट बालगंधर्व स्मारकाच्या कामास भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी कडेगावचे उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले, पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिठे, सरपंच अलका यादव, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, भिलवडीचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे आदि उपस्थित होते.
बालगंधर्व स्मारकाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करुन जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, काही व्यक्तिंचे कार्य मैलाचा दगड ठरणारे असते. त्या काळी नटसम्राट बालगंधर्व यांनीही नाट्यक्षेत्रात नवी विचारधारा आणली. म्हणूनच नाट्य क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. माझ्या सांगलीच्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकालाच्या प्रारंभीच स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास येत असल्याचे आत्मिक समाधान आहे, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिली क्षेत्रभेट बालगंधर्व स्मारक, नागठाणे येथे करण्याचा मनोदय होता. त्यानुसार पहिली भेट इथे डदेत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, स्मारकाच्या माध्यमातून नटसम्राट बालगंधर्व यांच्या जन्मगावी त्यांच्या कामाच्या स्मृती जपल्या जाणार आहेत. या गावाला भेट देऊन कार्यक्रमाद्वारे नटसम्राट बालगंधर्व यांना अभिवादन करावे, अशा दर्जाचे काम या वास्तुचे व्हावे, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी दिल्या. पहिल्या टप्प्यातील उर्वरित निधीसाठी पाठपुरावा करून मंजुरीप्राप्त कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. दुसऱ्या टप्प्यात आवश्यक उर्वरित कामाच्या मंजुरीसाठी मा पालकमंत्री व शासन स्तरावर पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र शासनाकडून नटसम्राट बालगंधर्व स्मारकास ३ कोटी ४६ लाख ७४ हजार ५०५ रुपये निधी मंजूर असून, यामध्ये स्मारकाची मुख्य इमारत व पोहोच रस्ते या कामांचा समावेश आहे. स्मारकाच्या मुख्य इमारतीत तळमजला व पोटमाळ्यासह पहिला मजला असे एकूण १८७३.८९ चौ. मी. काम असून यामध्ये प्रदर्शन सभागृह, म्युझियम, ग्रंथालय, तिकीट रूम, ४०० प्रेक्षक क्षमतेचे ऑडिटोरियम, स्टेज, ग्रीन रूम्स, प्रसाधनगृहे, प्रतीक्षागृह आदि कामांचा समावेश आहे. इमारतीचे आर सी सी काम, पूर्ण वीट बांधकाम, गिलावा, पत्रे, फरशी, प्लंबिंग ही कामे पूर्ण असून रंगकाम सुरू आहे.
याबरोबरच फर्निचर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, विद्युतीकरण, जोड रस्ता व गटर, कुंपणभिंत, अकॉस्टीक, ऑडियो, व्हिडीओ, स्टेज, लाईट, सीसीटीव्ही, फायर फायटींग सिस्टिम आदि कामांसह ७ कोटी, ९५ लाख रुपये अंदाजपत्रकाचा आराखडा त्रुटीपूर्ततेसह प्रशासकीय मान्यतेसाठी फेरसादर करण्यात आला आहे.
Post a Comment
0Comments