- मानसोपचारतज्ज्ञ डॉ.अरुण रुकडीकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
सांगली :
सध्या समाजाच्या सुबत्तेसोबत समाजात चिंता, काळजी आणि डिप्रेशनसारखे मनोविकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मानसिक आरोग्याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. परंतु मानसिक आजाराला कलंकाची भावना जोडल्यामुळे लोक उपचार घेण्याऐवजी लोक भोंदू धार्मिक संप्रदायाच्या जाळ्यात अडकले आहेत, त्यामुळे गावोगावी मानसिक आरोग्याची केंद्रे सुरू करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ञ आणि अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.
ते ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अरुण आणि डॉ. मेरी रुकडीकर यांनी लिहिलेल्या आणि चारुदत्त भागवत आणि कल्पना भागवत यांनी मराठीमध्ये अनुवाद केलेल्या ‘मानसिक आजार, आरोग्य आणि आपण’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
मैत्र सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने चारुदत्त भागवत यांच्या स्मृतीनिमित्त सांगली येथे मानसिक आरोग्य विषयी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. प्रा. अविनाश सप्रे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. दाभोलकर म्हणाले, मानसिक आजारांना आजार म्हणून न पाहता त्याला कलंकित नजरेने पाहिले जाते. याबाबत आपण मोठ्या प्रमाणात प्रबोधन करून समाजाची मानसिक आजाराकडे बघण्याची नजर निकोप केली पाहिजे. मानसिक आरोग्य सुविधा गावागावात पोचली तर अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम कमी होईल. शासनाने गावोगावी मानसिक आरोग्याची केंद्रे सुरू केली पाहिजेत. सर्वत्र शारीरिक आरोग्यासाठी ठिकठिकाणी जीम उपलब्ध आहेत, परंतु मानसिक आरोग्यासाठी तशी सुविधा आपल्या देशात नाही. मानसिक आरोग्याचे विषय हे शालेयस्तरापासून शिकविण्याची गरज आहे. याबरोबर आता मानसिक उपचारासाठी तंत्रज्ञानाचा वापरही केला पाहिजे.
दुसर्या सत्रात मानसतज्ञ कपील लळीत म्हणाले, आपल्याला शाळेत शिक्षण मिळते. परंतु भावनिक साक्षरतेबाबत माहिती मिळत नाही. भावना योग्य पद्धतीने कशा हाताळाव्यात याबाबत लोकांना प्रशिक्षीत केले तर अनेक समस्या सुटू शकतात. त्यासाठी तज्ज्ञ लोकांची मदत घेण्याची गरज आहे. बुद्धिमत्तेची चर्चा न करता लोकांमधील गुणांची चर्चा करून त्या दुरुस्त करण्याची गरज आहे.
‘आत्महत्या : मानसशास्त्राच्या भिंगातून’ या विषयावर बोलताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. चारुदत्त कुलकर्णी म्हणाले, आपल्या देशात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. ही गंभीर गोष्ट आहे. भारतात तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करीत आहे. ते रोखण्यासाठी सर्व समाजाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आत्महत्या करणार्या व्यक्तीला त्यापासून परावृत्त कसे करावे यासाठी खास प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. आत्महत्या करणार्या व्यक्तीबद्दल अनेक गैरसमज असतात. त्यामुळे आपले दुर्लक्ष होते. काही व्यक्ती पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत असतात. त्यांना समजून घेऊन त्यांच्यावर योग्यवेळी मानसोपचार करण्याची गरज आहे. या सर्वांची चर्चा डॉ. रुकडीकर यांनी त्यांच्या पुस्तकात केली आहे.
मानसिक आरोग्यामध्ये विवेकनिष्ठ विचारांचे महत्त्त्त्व या विषयावर बोलताना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, सर्व मानसिक आजाराच्या मुळाशी अविवेकी विचार आणि भावना कारणीभूत असतात. चुकीच्या विचारामुळे भीती, राग, दु:ख निर्माण होते, त्यामुळे अनकजण मानसिक आजाराला बळी पडतात. हे विचार धर्म, संस्कृती, समाजातून निर्माण झालेले असतात. त्यातून विचारदोष तयार होतात, आणि विचारदोषांमुळे आपले मानसिक आरोग्य बिघडते. त्यामुळे विचारदोष दूर करणारे कौशल्य शिकून घेण्याची गरज आहे.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अरुण रुकडीकर यांची मुलाखत प्रा. रमेश कट्टिमणी यांनी घेतली. त्यावेळी डॉ. रूकडीकर म्हणाले की, रुग्ण आणि नातेवाईकांना नेहमी पडणार्या प्रश्नांना समोर ठेवून या पुस्तकाची निर्मिती केली आहे. मानसिक आरोग्याचे शिक्षण या पुस्तकातून होईल. मनोरुग्णांची काळजी, संगोपन कसे करायचे याचे शास्त्रीय मार्गदर्शन या पुस्तकात आहे.
कल्पना भागवत यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन प्रतिमा सप्रे, पुस्तकाची ओळख स्नेहा पेंडे-जकाते यांनी केली. माधुरी देशमुख यांनी आभार मानले.
संयोजन उमेश देशमुख, राहुल थोरात, संजय पाटील, उज्ज्वला परांजपे, गणेश कांबळे, महेश कराडकर यांनी केले.
Post a Comment
0Comments